कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्विकारणार नसल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, यामध्ये समाधानकारक खाते मिळाले नसल्याने आणि काहींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने नाराजी नाट्याला सुरुवात झाली. खातेवाटपानंतर आघाडी सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आले. मात्र, थोरात यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला आहे.

कोल्हापूरचं पालकमंत्रीपद आमच्यातला सहकारीच स्विकारेल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट करत कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदावरून हे वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 8 जानेवारी रोजी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. या विषयी विचारले असता थोरात यांनी आपण कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्विकारणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आमची 12 पालकमंत्रीपदाची मागणी होती. मात्र 11 पालकमंत्री झाल्याने हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद आमच्यातीलच एक सहकारी स्वीकारेल असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने अनेक आमदार नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या एका मंत्र्यांने आपल्या खात्याचा पदभार स्विकारला नसून त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीला देखील दांडी मारली. त्यातच आता पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्या सुरु झाली आहे. दरम्यान, कालच शिवसेनेच्या एका आमदाराने मंत्रीपद मिळाले नसल्याने राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/