भाजपने बारामती जिंकली तर मी राजकरणातून निवृत्ती घेईन : अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यापैकीच एक बारामती मतदार संघ आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर भाजपकडून कांचन कुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच “बारामती मतदार संघात भाजपचा विजय झाला तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ” असे माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. बारामतीत राष्ट्रवादीच जिंकून येणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती येथील काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर ते पत्रकरांशी बोलत होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, “भाजपने बारामती जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन पण ही जागा भाजपला जिंकता नाही आली तर त्यांनी निवृत्ती घ्यावी” बारामती लोकसभा मतदार संघाबाबत असे खुले आव्हान अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिले. बारामतीचा गड १०० टक्के राखणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असे म्हणत सुप्रिया सुळेच विजयी होणार असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मध्ये यंदा प्रथमच भाजपकडून स्थानिक उमेदवार देण्यात आला आहे. या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बारामतीकर कुणाला देणार कौल ?

यंदाच्या निवडणुकांमध्ये बारामती मतदार संघात काटे की टक्कर होणार असे मानले जात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्यासारख्या राजकीय वारसा असलेल्या उमेदवार तर दुसरीकडे भाजपकडून स्थानिक उमेदवार कांचन कुल अशी लढत रंगणार आहे. भाजपने राहुल यांच्या पत्नी कांचन यांना उमेदवारी देत बारामतीतून पुन्हा पवार कुटुंबासमोर आव्हान उभे केले आहे.

दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.