‘…तर पुस्तक मागे घेईन’ : जयभगवान गोयल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लेखक जयभगवान गोयल यांच्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाला जोरदार विरोध होताना दिसत आहेत. अशात गोयल यांनी आता एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाने आदेश दिल्यास पुस्तक मागे घेऊ असे त्यांनी म्हटले आहे. पुस्तकाद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रकारे काम करत त्याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असल्याने मोदींचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे ते म्हणाले.

गोयल यांना पुस्तक मागे घेण्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आज के शिवाजी- नरेंद्र मोदी हे पुस्तक आता बाजारात आले आहे. जर पक्षाने सांगितलं तर पुस्तक मागे घेऊ. अनेकजण राम, कृष्ण म्हणत लोकांची तुलना देवांशी करतात. मी काही चुकीचे केले असे मला वाटत नाही.” असंही त्यांनी सांगितलं.

पुस्तकाचे समर्थन करताना गोयल म्हणाले, “आपण पाहिले असेल गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कोणीच वाली नव्हता. देशाच्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला आहे. मुंबईतही दहशतवादी हल्ले झाले आहेत. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशामध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. पाकने केलेल्या हल्ल्यालाही पाकमध्ये घुसून सरकारने प्रत्युत्तर दिले.”

मोदींवर स्तुतीसुमनं उधळत पुढे बोलताना गोयल म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच राज्यातील प्रत्येक व्यक्ती, माता, बहिणींची चिंता वाहिली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील देशातील माता-बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करताना दिसत आहेत. मोदी सरकारच्या राज्यात देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सक्षम असल्याचे वाटत आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराज काम करत होते तसेच काम नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे” असेही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/