मंदिरात महिलांना नव्हती ‘एंट्री’ ! IAS रितिका यांनी बदलली परंपरा, सोशल मीडियावर ‘कौतूक’

सोलन : पोलीसनामा ऑनलाइन  –    महिला आणि पुरूषांच्या समान अधिकारांचा आपल्या देशात मोठा गवगवा केला जातो. मुलगा आणि मुलगीमध्ये कोणताही फरक नाही, असे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात स्थिती खुप वेगळी आहे, याचाच प्रत्यय यावेळी दुर्गा अष्टमीला हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यात आला. येथे शूलिनी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. शनिवारी होमहवन यज्ञात जेव्हा महिला आयएएस अधिकारी रितिका जिंदल यांनी सहभागी होण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मंदिराच्या संचालकांनी त्यांना रोखले.

परंपरेचे कारण पुढे करत सांगण्यात आले की, मंदिरात महिलांना येण्याची परवानगी आहे, परंतु यज्ञ करण्याची नाही. यामध्ये केवळ पुरूषच सहभागी होऊ शकतात. कार्यकारी तहसीलदार असल्याने मंदिर क्षेत्र रितिका जिंदल यांच्या कार्यक्षेत्रात येते.

महिला आयएएसने शिकवला समानतेचा धडा

होमहवनमध्ये सहभागी होण्यास रोखल्यानंतर आयएएस अधिकार्‍याने उपस्थितांना समानतेचा धडा शिकवला. यामुळे त्यांना अनेक वर्षांची परंपरा नाईलाजाने बदलावी लागली. यानंतर या महिला आयएएस अधिकार्‍याने होमहवनमध्ये भाग घेतला.

धक्कादायक बाब ही आहे की, अष्टमीच्या दिवशी लोक कन्या पूजन करतात, महिलांच्या सन्मानाच्या मोठ-मोठ्या गोष्टी करतात, परंतु त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात.

रितिका जिंदल यांनी सांगितले की, मंदिरात त्यावेळी हवन सुरू होते. मी तिथे उपस्थित लोकांना हवनमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करत होते, परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की, मंदिरात महिलांना होमहवन करण्याची परवानगी नाही.

मी अधिकारी नंतर, अगोदर महिला

ही मानसिकता ऐकून आयएएस अधिकार्‍याला धक्का बसला. त्यांनी विचार केला की, स्त्री-पुरूष समानता सत्यात आणायची असेल तर अशी विचारधारा बलण्याची गरज आहे आणि ती तेव्हाच बदलली जाऊ शकते, जेव्हा या विचारांचा विरोध केला जाईल. रितिका जिंदल यांनी म्हटले, मी अधिकारी नंतर आहे, अगोदर महिला आहे. हा अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे. एका मुलीला होम हवनमध्ये सहभागी होऊ न देणे हे तर्कसंगत नाही. त्यांनी सांगितले की, असे अनेक वर्षांपासून सुरू आहे. यावर मी त्यांना म्हटले की, आम्ही डोळे बंद करून यासाठी समर्थन देऊ शकत नाही की अनेक वर्षापासून परंपरा सुरू आहे. आपले संविधान समान अधिकार देते. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे सांगितले आहे, असे त्या म्हणाल्या.