शेतकर्‍यांना आज मदत नाही झाल्यास उद्या तोंड दाखवायला जागा राहणार नाही : छत्रपती संभाजीराजे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यावर परतीच्या पावसामुळे ओढवलेल्या ओल्या दुष्काळ सदृश्य संकटात बळीराजा कोलमडून पडलेला असताना, शेतकऱ्यांचे अश्रू पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील नेते बांधावर फिरताना दिसत आहेत. मात्र, अद्यापही कोणत्याही प्रकारचा दिलासा राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही. त्या अनुषंगाने खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी, काही सुद्धा झालं तरी शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. कर्ज काढा पण शेतकऱ्यांना मदत करा, असेही संभाजीराजे म्हणाले.

खासदार संभाजीराजे हे अतिवृष्टी ग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, त्यांनी बीड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. तेव्हा, प्रशासनाचे अधिकारी अजूनही नुकसानीची पंचनामे करण्यासाठी आले नसल्याची खंत संभाजीराजेंनी बोलून दाखवली. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना बांधावर पाठवायला हवे, यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तद्वतच, केंद्र आणि राज्य असा वाद घालण्याची, राजकारण करण्याची ही वेळ नसून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करायला हवी. शेतकऱ्यांना आज मदत जाहीर न झाल्यास, उद्या त्यांना तोंड दाखवायलाही नेते मंडळींना जागा राहणार नाही, असेही संभाजी राजेंनी म्हटले. त्याचप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी, कर्ज काढा पण मदत जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली.

३८०० रुपयांच्या चेकवरुन शेतकऱ्यांचा संताप

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी रामपूरमध्ये काही शेतकऱ्यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात केवळ ३ हजार ८०० रुपयांचा चेक दिला. लहान लेकरं उपाशी बसलेत, धान्य वाहून गेले आहे, ३-४ लाखांचे नुकसान झाले आहे, एवढा तरी चेक कशाला दिलाय? तुमचा चेक घेऊन जा, अशा शब्दात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली.