भाजपने शिवसेनेला पाठिंबा देत महाराष्ट्रात सरकार स्थापन करावं, भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ खासदाराचा प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन सहा-सात महिने उलटून गेले, तरीही सरकारमध्ये कुरकुर सुरूच आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस पक्ष नाराज आहे. पण भाजपचे ज्येष्ठ खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी असे काही म्हटले कि त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. ते म्हणाले की, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, तर त्यांना भाजपने पाठिंबा द्यावा आणि सरकार स्थापन करावे.

अलीकडेच काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील निर्णयात स्थान नसल्यावरून नाराजी व्यक्ती केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी म्हटले होते की, सरकार शिवसेनेचे आहे. महत्त्वाचे निर्णय आम्ही घेत नाही.

सुब्रह्मण्यम स्वामी हे सत्ता स्थापनेपासूनच भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्याची सूचना करत आहेत. तसेच त्यांनी भाजपवर देखील टीका केली होती.

यादरम्यान महाआघाडीमध्ये राज्यपालांनी नियुक्त करायच्या १२ जागांवरून तणाव आहे. काँग्रेसने ४ जागांची मागणी केली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना मात्र ३ जागांसाठीच तयार आहेत. या सरकारच्या मंत्रिमंडळातील वाटा आमदारांच्या संख्येवर ठरला होता. तसेच सत्तेत सर्वांना समान वाटा हेही ठरले असल्यामुळे विधानपरिषदेच्या १२ जागांपैकी ४ जागा मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.

यात शिवसेनेला ५, राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला ३ जागा देण्याबाबत चर्चा होती. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने त्याबाबत ठाकरे यांची भेट घेतली असून अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.