शिवसनेनं ठरवलं तर बहुमत ‘सिद्ध’ होईल, ‘या’ बड्या नेत्यानं केला दावा, राजकीय हालचालींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असून शिवसेनेने ठरविले तर आवश्यक बहुमत सिद्ध करु शकते, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बहुमत असल्यास भाजपाने शपथविधी करावा, असा टोला मारला आहे.
राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप व्हावे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला.

शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा केला आहे. निकाल लागल्यानंतर भाजपाचे नेत्यांनी पुढाकार घेऊन चर्चेला सुरुवात करण्याची आवश्यकता होती. मग, त्यांनी का पुढाकार घेतला नाही असा प्रश्न करुन राऊत यांनी सांगितले की, जर भाजपाकडे बहुमताचा आकडा आहे, असे सांगत असतील तर आठ दिवस ते का थांबले. त्यांच्याकडे १४५ जणांचा पाठिंबा असेल तर त्यांनी आजही मंत्रीमंडळ बनविले तरी आमची काही हरकत नाही.

कार्यकर्ते, नेते व्यापारी नाहीत –

भाजपाने १३ कि १६ जागांची ऑफर दिली असे विचारले असताना संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते हे व्यापारी नाहीत, असे सांगून भाजपावर टिका केली. शरद पवार यांची घेतलेल्या भेटीबाबत ते म्हणाले, शरद पवार यांची भेट घेण्यात गैर काय? मोदीही त्यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतात. सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ही भेट होती.

महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असल्याचे सांगून राऊत यांनी आपण मुख्यमंत्री पदापासून माघार घेतलेली नसल्याचे दाखवून दिले आहे. संजय राऊत यांच्या या आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपा व शिवसेनेतील दरी आणखी वाढली असल्याचे सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरे हे ३ तारखेला औरंगाबादला जात असून तेथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तर आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यांवर आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या मागण्यावर ठाम असल्याचे व वाट पहाण्याची तयारी असल्याचे दर्शवित आहेत.

Visit : Policenama.com