TikTok डाऊनलोडसाठी तुम्हाला ‘हा’ मेसेज आला असले तर रहा सावध, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यात भारत-चीन संघर्षानंतर भारतामध्ये चीनविरोधी संतापाची लाट उसळली. यानंतर भारताने चीनची सर्वच बाजूने कोंडी करण्यास सुरुवात केली. भारताने चीनी अॅपवर बंदी घातली. यामध्ये शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली. मात्र लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या व्हर्जनमधून मेसेज येत आहेत. हा एसएमएस अनेकांना मिळाला असून यामध्ये टिकटॉक भारतात पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे. एसएमएसमध्ये टिकटॉक प्रो नावाच्या एपीके (apk) फाइलची लिंक आहे. त्यामुळे टिकटॉक हवे असणारे अनेक लोक आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करत आहेत. मात्र असे केल्यामुळे तुमचा फोन आणि खासगी डेटासाठी हे धोकादायक ठरू शकतं.

या मेसेजमध्ये म्हटले आहे की, टिकटॉक भारतात पुन्हा आले आहे. नवीन फीचर्ससह आता क्रिएटिव्ह व्हिडीओ पुन्हा तयार केले जाऊ शकतात. खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा नवी TikTok v1. या मेसेजसोबत एक लिंक देण्यात आली आहे, जी एपीके फाईलची आहे. या लिंकवर क्लिक केले तर एपीके ॲपचे स्टोअर उघडले जाते. ज्यामधून युजर्स खरे टिकटॉक समजून डाऊनलोड करत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये लिंक उघडल्यानंतर फोन अज्ञात ॲप इस्टॉल करण्याची परवानगी मागितली जाते. त्यानंतर युजर सेटिंगमध्ये जाऊन परवानगी ऑन करतो, त्यानंतर त्याला इंस्टॉल करण्याचा ऑप्शन मिळतो आणि अॅप सहजपणे फोनमध्ये काम करण्यास सुरुवात करते. जे लोक एपीके फाईल डाऊनलोड करुन अॅप चावित आहे. परंतु त्यांना हे माहित नाही की यामुळे त्यांच्या फोन आणि डेटाला किती धोका आहे. ज्यावेळी एखादी फाईल अधिकृतपणे उपलब्ध नसते आणि आपण त्याची एपीके फाईल वापरत असतो, त्यावेळी त्यात काय बदल केले आहेत हे आपल्याला सापडत नाही.

याचा अर्थ असा की ते सहजपणे आपल्या फोनमध्ये मालवेयर, स्पायवेअर येऊ शकते. त्यानंतर आपला खाजगी डेटा एपीके फाईल डेव्हलपर्सकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुमच्या हे देखील लक्षात येईल की, ज्यावेळी तुम्ही एखादे नवीन अॅप डाऊनलोड करता त्यावेळी तुम्हाला कॅमेरा, ऑडिओ, गॅलरी, कॉन्टॅक्ट, लोकेशन यासारख्या पर्यांसह अनेक गोष्टीकडून परवानगी मागितली जाते. जर तुम्ही त्याला Allow केले तर तुम्ही कोठे जाता, कोणाशी बोलता, हे सर्व डेव्हलपर्सला समजते. म्हणजेच काय तर तुमच्या फोनचा सर्व अॅक्सेस हा त्या डेव्हलपर्सला मिळू शकतो.