पक्षविरोधी कारवाया कराल तर गय करणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्षांचा खडसे – पंकजा मुंडेंना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोपीनाथ गडावरुन काल जाहीर कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंनी आपली नाराजी वक्त केली. यामुळे राज्यातील पक्ष श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज झाली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यास गय केली जाणार नाही असा अप्रत्यक्ष सूचक इशारा बंडखोरांना दिला.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की मी काल गोपीनाथ गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. मला अनेकांनी सांगितलं होतं की त्याठिकाणी जावू नये काहीतरी अमानुष प्रकार घडू शकतो. परंतू मी ठाम होतो. संवादाने सर्व काही सुटू शकतं.

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावरुन बंड केल्याची काही उदाहरणं सांगितली. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पण महाराजांनी बंड मोगलांविरोधात केलं होतं, सावरकरांनी इंग्रजांविरोधात बंड केलं होतं. स्वकीयांविरोधात बंड करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचे नसते चर्चा करायची असते. घरातील भांडणे चव्हाट्यावर आणायची नसतात असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी मुंडे-खडसेंना दिला.

चंद्रकांत पाटलांनी बंडखोर नेत्यांना यावेळी अप्रत्यक्षरित्या सूचक इशारा दिला, ते म्हणाले की केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झाले आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगले केले तर बक्षीसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केले तर शिक्षा दिली जाईल.

चंद्रकात पाटील म्हणाले की शरद पवार पावसात भिजले, त्यांच्या ईडीच्या चौकशीनंतर वातावरण बदलले म्हणून राज्यातील सरकार बदलले याबद्दल बोलले जाते. पण आपण एकोप्याने वागलो नाहीत म्हणून आपले सरकार आले नाही.

गोपीनाथ गडावर एकनाथ खडसेंनी आपली भाजपवरील नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की नाथाभाऊंची वेदना समजू शकतो. त्यांनी दु:ख व्यक्त केले, त्यात चूक नाही. आपल्या तक्रारी आणि व्यथांची पक्ष दखल घेईल. त्यावर उत्तर काढू. पण भविष्यात सगळं नीट झाल्यावर अपराधी आणि संकोच वाटेल असे संवेदनशील शब्द वापरु नका, अशी दोघांना विनंती, त्याचे ओरखडे कायम राहतात. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढताय? असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/