पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात चालवली जातात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट, पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड

कझाकीस्तान, उझेबेकीस्तान, नेपाळमधील महिलांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी परिसरात एका पंचतारांकित हॉटेलात महिलांना ठेवून तेथून पुण्यात ऑनलाईन पद्धतीने (एस्कॉर्टिंग) सेक्स रॅकेट चालविले जात असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला असून, त्यांनी कझाकीस्तान, उझेबेकीस्तान, नेपाळ देशाच्या महिलांसह 6 जणींची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी दलाल मॉन्टी उर्फ जगन्नाथ आर्यल याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक डेक्कन भागात गस्त घालत होते. त्यावेळी शिवाजीनगर भागातील एका हॉटेलजवळ परदेशी महिला थांबली असून तिला वेश्याव्यवसायासाठी मॉन्टी नावाच्या दलालाने पाठविले असल्याची माहिती पोलीस शिपाई पुष्पेंद्र चव्हाण आणि संतोष भांडवलकर यांना मिळाली. त्यानुसार, खातरजमा करण्यात आली. त्यानंतर तेथून परदेशी महिलेला ताब्यात घेतले.

तिच्याकडे चौकशी केली असता तिने मॉन्टी नावाचा दलाल असून, त्याने हिंजवडी भागातील एका हॉटेलमध्ये महिलांना ठेवल्याची माहिती मिळाली. हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी तीन महिला परदेशातील असून त्या मूळच्या कझाकिस्तान आणि उझबेकीस्तानमधील आहेत. सुटका करण्यात आलेल्या अन्य तीन महिलांपैकी एक नेपाळची आहे. दोघी भारतातील आहेत.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक खडके, पुकाळे, शिंदे, माने, करपे, खाडे, चव्हाण, कोळगे यांनी ही कारवाई केली.

शहरातील उच्चभूर भागात ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणार्‍या वेश्याव्यवसायाचे (एस्कॉर्टिंग) जाळे फोफावले आहे. दलालाकडून वेगवेगळ्या ठिकाणी महिला व तरुणांना ठेवले जात आहे. व्हॉट्सअप तसेच ऑनलाईनपद्धतीने ग्राहकांशी संपर्क साधला जात आहे. त्यानंतर त्यांना जवळच्या परिसरात बोलावून येथे महिलांना वेश्या मगनांसाठी पाठविले जात आहे. गेल्या काही वर्षात शहरातील एस्कॉटिंगचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे.