भाजप नेत्याच्या घरी सापडला अवैध शस्त्रसाठा

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूकीच्या धामधुमित मध्यप्रदेशमध्ये एका भाजप नेत्याच्या घरी अवैध शस्त्रसाठा सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशमधील सेंधवा येथील संजय यादव या भाजप नेत्याच्या घरी पोलीसांनी धाड टाकून हा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव याच्या घरात अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी यादव याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत त्याच्या घरातून १३ पिस्तुलं, १७ देशी बॉम्ब, ११६ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी संजय यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी यादव याच्यावर धमकावणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल आहेत. यादव याच्या विरोधात आत्तापर्यंत एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. सध्या यादव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.