मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक, ‘या’ मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एकीकडे राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढत होत असताना महाविकास आघाडी सरकार मध्ये खदखद सुरु असल्याचा पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याचं पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाची बैठक पार पडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएस अधिकाऱ्यांची बदली, तसेच उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात अशी तक्रार काही नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.

राज्यात जुलै महिन्यापर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर मुंबई व परिसरात कोरोना संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच नागरिकांना प्रवास करावा, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. पण यावरती नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्यावर राज्य सरकारनं ही अट मागे घेतली. मात्र, या आदेशावरही शरद पवार यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर, पोलीस आयुक्तांनी दोन किलोमीटर परिघातच प्रवास करण्याची मुभा हा नियम रद्द करुन घराशेजारी खरेदी करा, असे आवाहन नागरिकांना केले. तर या निर्णयावरती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता.

दरम्यान, शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार समजले जातात. म्हणून त्यांच्याच पुढाकाराने उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे. राज्याला आर्थिक चालना देण्यासाठी व्यवहार सुरु करण्याच्या दृष्टीने शरद पवार आग्रही होते. पण उद्धव ठाकरे सरकारने त्यांना विश्वासात न घेताच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, असं सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काय होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.