काँग्रेस-राष्ट्रवादीचे तब्बल २५ आमदार भाजपच्या संपर्कात ; भाजपच्या ‘या’ मंत्र्याचा शड्डू ठोकून दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे तब्बल 25 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते आहे. याबाबातचा खुलासा खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केला आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले की यावर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत विरोधी पक्षांना मोठा धक्का बसणार आहे. येत्या ऑक्टोंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत.

भाजपच्या गिरीश महाजन यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमीत कमी आमदार माझ्या संपर्कात आहेत, त्यातील काही जणांनी व्यक्तीगत स्थरावर माझ्याशी चर्चा केली आहे, तर काही जणांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली आहे. काहींनी इतरांकडून मला संदेश पाठवला आहे की त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे.

महाजन यांनी सांगितले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना देखील माहित नाही की जे लोक सध्या त्यांच्या सोबत आहेत ते लवकरच पक्ष बदलणार आहेत. राज्याची राजकीय परिस्थिती पुर्णत्वा भाजपला अनुकूल आहे.

गिरीश महाजन यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर देखील खुलासा केला आहे, 17 जून पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशना आधी राधाकृष्ण पाटील यांना भाजपमध्ये सहभागी केले जाईल असे संकेत देखील महाजन यांनी दिले आहे. त्यांनी सांगितले की अमित शाह यांनी दिल्लीत 9 जूनला बैठक बोलावली आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील इतर वरिष्ठ नेते सहभागी असतील.

मागील विधानसभा निवडणूकीत भाजपला 122 जागा तर शिवसेनेला 63 जागांवर विजय मिळवता आला होता, तर काँग्रेस – राष्ट्रवादीला 41 – 41 अशा जागांवर समाधान मानावे लागले होते.
परंतू आता गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 25 आमदार आपल्या संपर्कात असून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सुतोवाच केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण यंदाच्या लोकसभेत या दोन्ही पक्षांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.