पोलीस ठाण्यातच पोलिसाला शिवीगाळ

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मुलीने तक्रार दिल्याने जावयाने सासऱ्याला मारहाण केली. याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली असताना जावई-सासऱ्याचा वाद सुरू असताना मध्यस्ती गेलेल्या पोलीस हवालदारास शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार सोमवारी (दि. २४ ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यात घडला.

पोलीस हवालदार अविनाश विठ्ठल बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रवीण बापू कसाळे (२७, रा. माण ग्रामपंचायत समोर, माणगाव, हिंजवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कसबे हा पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

त्या गुन्ह्यात समज देण्यासाठी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून दिले. त्यानंतर प्रवीण याने घरी जाऊन त्याच्या सास-यांना मारहाण केली. त्यामुळे त्याचे सासरे हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. प्रवीण सास-यांच्या मागून पोलीस ठाण्यात आला आणि सास-यांना तक्रार देऊ नका म्हणून धमकाऊ लागला.

यावेळी पोलीस हवालदार अविनाश बोराटे यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी गैरवर्तन करीत सरकारी काम बंद पाडले. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.