नागपुरातील एकूण ‘कोरोना’ बाधितांपैकी 61 % सप्टेंबर महिन्यातील

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर वाढत असताना धक्कादायक आकडेवारी उघडकीस येत आहे. नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे 75 हजार 815 बाधित आढळले आहेत. त्यापैकी 61 टक्के रुग्ण केवळ सप्टेंबर महिन्याच्या 28 दिवसांत आढळले आहेत. आजपर्यंतच्या एकूण मृत्यूंपैकी 57.13 टक्के मृत्यू नोंदवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळला होता. त्यानंतर जुलैपासून बाधितांची संख्या वाढू लागली. 30 जुलैला नागपूर जिल्ह्यात 5 हजारच्या जवळपास बाधितांची नोंद झाली होती. त्यामध्ये 118 मृत्यू नोंदवले गेले होते. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत बाधितांची संख्या 29 हजार 555 वर पोहोचली. त्यामध्ये 1 हजार 45 मृत्यू नोंदवले गेले. 1 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान नागपूर जिल्ह्यात 46 हजार 260 बाधितांची नोंद झाली. ही आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत 61 टक्के आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या 28 दिवसांमध्ये तब्बल 1 हजार 393 मृत्यू नोंदवले आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात येथे कोरोनाचा उद्रेक जास्तच तीव्र झाल्याचे दिसत आहे.