Coronavirus : चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात 91 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण, बाधितांचा आकडा 2416 वर तर आजपर्यंत 26 जणांचा बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून कोरोनाविरोधात लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. राज्यात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या 2416 पोलिसांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील चार दिवसांपासून पोलिसांना संक्रमण होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 91 पोलिसांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या चार दिवसांच्या अहवालावर नजर टाकली तर गुरुवारी 131, शुक्रवारी 116 आणि शनिवारी 114 तर रविवारी 91 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 65 हजाराच्यावर गेली आहे. राज्यातील पोलीस दलात देखील कोरोनाने शिरकाव केला असून आतापर्यंत 2416 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. कोरोनामुळे 26 पोलिसांचा मृत्यू झाला असून सध्या 1421 अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शनिवारी राज्यात 114 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये 10 पोलीस अधिकारी आणि 104 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मागील चार दिवसांपासून पोलिसाना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता वाढत चालली आहे. शनिवारपर्य़ंत आढळून आलेल्या 2325 रुग्णांपैकी 259 पोलीस अधिकारी आणि 2066 पोलीस कर्मचारी आहेत. तर 970 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.