पिंपळे गुरव मध्ये वृद्धाचा मृतदेह तर चिंचवड मध्ये स्त्री जातीचे अर्भक सापडले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपळे गुरव येथे राहत्या घरामध्ये एका वृद्धाचा कुजलेला मृतदेह आढळला तर चिंचवड येथे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

सांगवी, पिंपळे गुरव येथे चंद्रकांत गेनू भोसले (६५, रा. सुवर्णपार्क, पिंपळेगुरव) यांचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रकांत यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. तेव्हापासून ते त्यांच्या मुलासोबत पिंपळेगुरव येथे राहत होते. त्यांचा मुलगा तीन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने ते एकटेच घरात होते.

दरम्यान, चंद्रकांत यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले असता चंद्रकांत यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. चंद्रकांत हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. या आजारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहेत.सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

चिंचवड येथे रविवारी दुपारी २ च्या सुमारास एका स्थानिक नागरिकाने धनेश्वर पुलाजवळ दुर्गंधी सुटल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एका सिमेंटच्या पोत्यामध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी अर्भक यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात हलवले आहे. तपास वाकड पोलीस करीत आहेत.

You might also like