भरदिवसा धाडसी चोरी, ४० लाखांच्या रोकडसह २० तोळे सोने चोरीला

उदगीर (लातूर) : पोलीसनामा ऑनलाइन – उदगीर शहरात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून ४० लाख रुपयांची रोकड आणि ३ लाख रुपयांचे २० तोळे सोन्याची बिस्किटे चोरून नेली. ही घटना शेल्हाळ रोडवरील सहजीवन कॉलनीत रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात सोमवारी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गोपाळराव सोनफुले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सोनफुले हे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी देगलूर रोडवरील मंगल कार्य़ालयात गेले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाटात ठेवलेले २० तोळे सोन्याची बिस्किटे आणि शेती विकून आलेली ४० लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. चोरट्यांनी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

सोनफुले कुटुंब विवाह सोहळा आटोपून घरी आले असता घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चंद्राकांत सोनफुले यांनी चोरीचा प्रकार उदगीर शहर पोलिसांना कळवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र श्वानपथक याच ठिकाणी घटमळले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव करीत आहेत.