राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नी – मुलाला ‘कोरोना’ची लागण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सात लाखाच्या जवळपास गेली आहे. कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे

मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले आमदार यशवंत माने यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशवंत माने हे मुळचे इंदापूरचे आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची यादी करण्यात आली. यानंतर यशवंत माने यांनी जर कुणी संपर्कात आले असेल तर त्यांनी क्वारंटाइन व्हावे किंवा आरोग्य प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यशवंत माने यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि सोळा वर्षाच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय त्यांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आमदार यशवंत माने आणि कुटुंबावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या स्वीय सहाय्याकाला निमगाव केतकी येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी माने यांनी कार्यकर्त्यांना आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.