इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणेंचं पारड जड, निकालाची उत्सुकता शिगेला

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहिलेली इंदापूर 200 विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे विरूद्ध राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील या दोघात अटीतटीची व चुरशिची लढत मानली जाते. उद्या दि. 24 रोजी होत असलेल्या मतमोजणी निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले असल्याने इंदापूर तालुक्यात चर्चेला व अफवांना मोठे उधान आले आहे. तर आपल्याच पार्टीचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवल्याची चर्चा रंगत आहे. विशेषता: ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अनेकांनी आपआपल्या नेत्याच्या विजयाबाबतच्या पैजा देखील लावल्याची चर्चा सुरु आहे.

2009 च्या विधानसभेला काँग्रेस पक्षाकडून हर्षवर्धन पाटील हे साडेसात हजाराच्या मताधीक्याने निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पराभुत केले होते. तर 2014 च्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांचा 14 हजार 173 इतक्या मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणूक निकालामध्ये मतदार यादीत वाढ झालेले नविन मतदार यांची भुमिका महत्वाची ठरली होती. जवळ जवळ 15 हजाराच्या आसपास नविन मतदारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र होते. व दत्तात्रय भरणे हे 14 हजार मताधिक्याच्या फरकाने विजयी झाले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत इंदापूर विधानसभा मतदार संघात 28 हजार 668 इतक्या मोठ्या प्रमाणात नविन मतदारांची वाढ होऊन देखील या निवडणुकीत नविन मतदारांचा म्हणावा तसा प्रभाव दिसुन आलेला नसल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये मतदानाच्या टक्केवारीत झालेली 4 टक्यांची घसरण.

2014 च्या तुलनेत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्काही घसरल्याचे दिसुन येत आहे. 2014 च्या निवडणूकीत इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकुण 78.77 टक्के इतके मतदान झाले होते. तर यंदाच्या निवडणूकीत ही टक्केवारी कमी झाल्याचे दिसुन येत असुन 75.92 टक्के इतके मतदान झाल्याने यावेळी जवळ- जवळ 4 टक्के मतदान कमी झाल्याचे दिसुन येत आहे. कमी टक्केवारीला अनेक कारणे असुन मतदानाच्या आदल्या दिवसापासुन सुरू असलेला धो-धो कोसळणार्‍या पाऊसामुळे देखील बर्‍याच मतदारांना वेळेत मतदान करण्यासाठी जाता आले नाही. तर काही ठीकाणी संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्याने अनेक मतदारांना मतदानासाठी उपस्थित राहून ताटकळत बसावे लागले व त्यामुळे अनेक मतदार प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराज होऊन मतदान न करताच घरी परतले.

बाहेरगावाहून येणारे मतदार यांनीही पावसामुळे मतदानाला न येता घरी बसनेच पसंत केल्याने इंदापूर विधानसभा मतदार संघातील टक्का घसरला असल्याचे जानकारांचे मत आहे. तरी पण मतदारामध्ये मतदानाच्या दिवशी मोठा उत्साह दिसुन येत होता. तर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यापासुन निकालाची तारिख जसजसी जवळ येऊ लागली तस-तसा मतदारामधील उत्साह शिगेला पोहचला असुन सर्वांना उद्याच्या निकालाचीच काळजी लागुन राहील्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. ग्रामीण भागात तर अनेक ठीकाणी पैजाही लागल्याची चर्चा असुन उद्या दि. 24 रोजीच या निकालाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Visit : Policenama.com