पँगाँग : भारताच्या आक्रमक कारवाईनंतर चीनचं ‘मिशन डॅमेज कंट्रोल’

बिजींग : वृत्तसंस्था – लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या भागात चीननं घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांनी हा डाव उधळून लावला होता. भारताच्या या आक्रमकतेनंतर चीनची चांगलीच नाचक्की झाली. त्यानंतर आता चीनकडून बाजू सावरण्यासाठी मिशन डॅमेज कंट्रोल सुरू करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासात चीनकडून 5 वक्तव्ये जारी केल्याचं दिसत आहे. यातील 2 वक्तव्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची, 1 चीनी लष्कराचं, 1 भारतातील चीनी दूतावासानं केलं आहे.

भारत चीन सैन्यात पँगाँग सरोवराजवळ संघर्ष झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया ही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजीन म्हणाले, “चीनचं सैन्य कायमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं पालन करतात. त्यांही कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही असंही ते म्हणाले. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. चर्चेतून येणाऱ्या सकारत्मक बाबी तुम्हाला सांगितल्या जातील असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

चीनचं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, दोन्ही देशात सुरू असलेल्या चर्चेत सहमती झालेल्या निर्णयाचं भारतानं उल्लंघन केलं आहे. सोमवारी भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असा आरोपही ग्लोबल टाईम्सनं केला. भारताची ही कृती चीनला उकसवण्यासाठी होती असंही त्यांनी म्हटलं आहे.

भारतीय जवानांच्या आक्रमकतेमुळं चीनी सैन्य नव्हे तर चीन सरकारही बॅकफूटला गेलं आहे असं चित्र दिसतंय. चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांनी म्हटलं की, भारत आणि चीन दरम्यान सीमा निश्चिती झाली नाही. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना होत राहणार. दोन्ही देशांचं नेतृत्व कायम सहमतीनं घेतलेले निर्णय लागू करण्याबाबत आणि मदभेदांचे रूपांतर वाद हेईल असं कोणतंही कृत्य करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. ड्रॅगन आणि हत्तीनं एकमेकांसोबत लढण्याऐवजी एकमेकांना सहकार्य करायला हवं. दोन्ही देशांनी वादाऐवजी हितांना प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

भारतीय सैनिकांनी 31 ऑगस्टला नियंत्रण रेषेवर अतिक्रमण केल्याचा आरोप भारतातील चीनच्या दूतावासानं केला. चीनी दूतावासाचे प्रवक्ते पुढे म्हणाले, भारतीय सैनिकांनी अतिक्रमण केल्यानंतर डिवचण्याची कारवाई केली. त्यामुळं सीमाभागात पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतानं उचलेल्या या पावलामुळं चीनच्या सार्वभौमत्वाचं मोठं उल्लंघन झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय सैन्यानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारी जावं अशी मागणी केली आहे. सीमा प्रश्नी असलेला वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं. चीनच्या सैन्यानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही असा दावाही त्यांनी केला.