राहुल गांधी यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘हि आहेत भारतातील मोदी निर्मित संकटे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारत देशाची अर्थव्यवस्था कोणत्या कारणांमुळे खालावलीय याची यादीच आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. तसेच राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन तथा जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून 23.9 टक्क्यांनी आक्रसल्याचे सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर देशातील करोनाग्रस्तांचा आकडाही दिवसोंदिवस वाढतोय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन नरेंद्र मोदी मेड डिझास्टर म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटे असे म्हणत देशासमोर सहा समस्यांची यादीच पोस्ट केलीय.

India is reeling under Modi-made disasters:
1. Historic GDP reduction -23.9%
2. Highest Unemployment in 45 yrs
3. 12 Crs job loss
4. Centre not paying States their GST dues
5. Globally highest COVID-19 daily cases and deaths
6. External aggression at our borders

भारत देश मोदी मेड डिझास्टरखाली दाबला गेलाय. या शिर्षकाखाली राहुल गांधी यांनी सहा वेगवेगळ्या समस्यांची यादी ट्विट केलीय. यात त्यांनी पहिला मुद्दा उणे 23.9 टक्क्यांनी आक्रसलेला जीडीपीचा दर, दुसरा मुद्दा 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, तिसरा मुद्दा 12 कोटी लोकांचा रोजगार बुडणे, चौथा मुद्दा केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, पाचवा मुद्दा करोनाबाधितांच्या आकड्यात आणि मृत्यूमध्ये दैनंदिन पातळीवर सर्वात अधिक जागतिक वाढ भारतात असणे. तसेच सहावा मुद्दा भारताच्या सीमावर शेजारच्या देशांनी कुरघोड्या करण्याचा आहे, असे म्हटले आहे.

जीडीपीबाबातीची आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भातील इशारा याअगोदरच दिला होता, हे सांगणारा एक जुना व्हिडिओ देखील ट्विट केला होता. मार्च 2017 रोजी काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी येणार्‍या आर्थिक संकटाविषयी भाष्य केले होते. या आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा हाच जुना व्हिडीओ राहुल गांधी यांनी 31 ऑगस्ट रोजी ट्विट केलाय.

त्याचबरोबर जीडीपी 24 टक्क्यांनी कोसळलाय. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झालीय. प्रत्येक इशार्‍याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाणे, हे खूप दुर्दैवी आहे, असे म्हणत काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती.

जीडीपीसंदर्भातील आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील अर्थव्यवस्थाही अशाच प्रकारे नकारात्मक आकडेवारीत आहे, असे म्हटले आहे.