अक्साई चीनमध्ये PLA चे 50 हजार सैन्य, भारताकडून T-90 रणगाडयांची स्क्वाड्रन शेवटच्या चौकीजवळ ‘तैनात’

पोलिसनामा ऑनलाईन – भारत आणि चीनचा वाद अजूनही संपलेला नसून अक्साई चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने 50 हजार सैनिक सज्ज ठेवले आहेत. चीन दाखवत असलेल्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने सुद्धा दौलत बेग ओल्डी येथे मिसाइल डागणार्‍या टी-90 रणगाड्यांची स्क्वाड्रन, सैन्य वाहने आणि 4 हजार सैनिकांची तुकडी तैनात केली आहे.

क्सगाम-काराकोरम पास एक्सिसवरुन चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ही तैनाती केली आहे.काराकोरमच्या दक्षिणेला आणि चीप-चाप नदीच्या किनार्‍याजवळ दौलत बेग ओल्डी येथे 16 हजार फूट उंचीवर भारताची शेवटची चौकी आहे. दारबूक-श्योक-डीबीओ रोडवरील काही पूल टी-90 रणगाड्यांचा 46 टन वजनाचा भार पेलू शकत नव्हते. त्यामुळे लष्कराच्या कमांडर्सनी विशेष उपकरणे वापरुन नदी, नाल्यांच्या वाटे हे रणगाडे दौलत बेग ओल्डीच्या शेवटच्या चौकीपर्यंत पोहोचवले आहेत. गलवान खोर्‍यात 15 जूनला चिनी सैन्याबरोबर झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारतीय लष्कराकडून सैन्य आणि रणगाडयांची तैनाती करण्यात आली आहे. पेट्रोलिंग पॉईंट 14 ते 17 आणि पँगाँग टीएसओमध्ये चीनने आक्रमकता दाखवल्यानंतर भारचीय लष्कराने सैनिकांना वाहून नेणार्‍या गाडया आणि शस्त्राास्त्रे पाठवून दिले आहेत.