Lockdown India : भारताला 21 नव्हे तर तब्बल 49 दिवसांचं ‘लॉकडाऊन’ गरजेचं, तज्ञांचं मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगभरातील 11 लाखापेक्षा जास्त लोक या आजाराने संक्रमित असून 61 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातदेखील याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हे लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. जो 14 एप्रिलपर्यंत लागू आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. दरम्यान, इतर देशांची आणि भारताची परिस्थिती पाहता 21 दिवसांचा नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे. केंब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्या संशोधकांनी एका संशोधनात यासंदर्भात माहिती दिली.

संशोधनानुसार,कोरोनाला भारतात पसरण्यापासून रोखण्यासाठी 49 दिवस संपूर्ण लॉकडाऊन किंवा नियमितपणे दोन महिन्यांत काही दिवसांची विश्रांती त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. ‘इज स्ट्रक्चर्ड इम्पॅक्ट ऑफ सोशल डिस्टॅन्सिंग ऑन कोविड-19 एपिडिमिक इन इंडिया’ या शीर्षकाने एक अहवाल जारी करण्यात आला. ज्यात गणिताचे एक मॉडेल देण्यात आले आहे. यामध्ये भारतातील लोकसंख्येचे वय आणि सामाजिक संपर्क रचना यांचा समावेश आहे. या अहवालानुसार सांगण्यात आले आहे कि, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सामाजिक अंतर असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यानुसार भारतात 21 नव्हे तर किमान 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे.

तसेच, या संशोधनात सामाजिक अंतराचे उपाय, शाळा, कॉलेज, ऑफिस बंद करणे, याबरोरच लॉकडाऊन आणि त्याच्या कालवधीच्या परिणामकारतेबाबत सांगण्यात आलं आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरस विरुद्ध अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. अशावेळी कोरोनावर मात करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे हा जालीम उपाय ठरू शकतो. मात्र कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लॉकडाऊन कालावधीत वाढ करण्याबाबत कोणतीही योजना नसल्याचे म्हंटले आहे.