Coronavirus : देशात 24 तासात ‘उच्चांकी’ 9304 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 260 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 6075 बळी

नवी दिल्ली : देशभरात गुरुवार सकाळपर्यंतच्या २४ तासात प्रथमच ९ हजार नवीन कोरोना बाधितांचा टप्पा ओलांडला असून एका दिवसात ९ हजार ३०४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्णांच्या मृत्युची संख्या ६ हजारांहून अधिक झाली आहे. त्यापैकी १ लाख ६ हजार ७३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेले काही दिवस देशभरात दररोज आठ हजार ते साडे आठ हजार नवीन कोरोना बाधित आढळून येत होते. आज प्रथमच ही संख्या ९ हजारांहून अधिक झाली आहे. देशात गेल्या २४ तासात २६० रुग्णांचा मृत्यु झाला. त्यामुळे आतापर्यंत देशभरात ६ हजार ७५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यापूर्वी २९ मे रोजी एकाच दिवसात सर्वाधिक २६९ रुग्णांचा मृत्यु झाला होता.
देशभरात बुधवारी दिवसभरात ३ हजार ८०४ रुग्ण बरे होऊन घरी केले आहेत. आतापर्यंत देशभरातील रुग्णालयातून १ लाख ४ हजार १०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.