भारत-पाक तणावामुळे भारतीय रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ४ मार्चपासून समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. भारत पाक यांच्यातील तणावानंतर समझौता एक्सप्रेस अटारी येथे रोखण्यात आली होती. यावेळी ट्रेनमध्ये एकूण २७ प्रवासी होते. दरम्यानच्या प्रवाशांना भारतात कसे पाठवायचे ? यावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्यत्तर देत अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून देखील LOC मध्ये घुसखोरी करण्यात आली. पण यात पाकिस्तानला यश आलं नाही. पाकिस्तानचं एक लढाऊ विमान भारताने पाडलं. भारताच्या या कारवाईत हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन हे चालवत असलेलं मिग विमान मात्र भरकटलं आणि अभिनंदन पाक हद्दीत पडले. त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं.

अभिनंदन यांची सुटका आज
भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्तान अखेर विंग कमांडर अभिनंदन याची शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत त्यांनी ही घोषणा केली. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.

समझौता एक्सप्रेस
समझौता एक्सप्रेस ही भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आठवड्यातून दोन वेळा धावणारी एक प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी भारतीय राजधानी दिल्लीला अमृतसरमार्गे पाकिस्तामधील लाहोर शहरासोबत जोडते. भारतीय रेल्वेची दिल्लीहून सुटणारी गाडी भारत-पाकिस्तान सीमेजवळ अटारी गावापर्यंतच धावते. येथे सर्व प्रवाशांना उतरून कस्टम व इमिग्रेशन पूर्ण करावे लागते. त्यानंतर त्यांना पाकिस्तान रेल्वेद्वारे चालवल्या जात असलेल्या एका वेगळ्या गाडीत चढावे लागते. ती वेगळी गाडी लाहोरपर्यंत धावते.

सिमला करारात ठरल्याप्रमाणे ह्या रेल्वे प्रवासाचा २२ जुलै १९७६ रोजी प्रारंभ करण्यात आला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांचा फटका ह्या सेवेला बसत असून आजवर अनेकदा ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.