जवानांकडून पुण्यातील ‘दगडूशेठ’ गणपतीची काश्मिरमध्ये स्थापना

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन –  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची जम्मू-काश्मिरमधील गुरेज सेक्टर कंजलवान या गावी स्थापना करण्यात आली आहे. या गावात दगडूशेठ गणपतीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सातत्याने येणाऱ्या भारतीय लष्करातील 6 मराठा बटालियन सैनिकांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. त्यामुळे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ गणपती मूर्तीची स्थापना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याकरीता कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र ट्रस्टला पाठविले होते. त्यानुसार दगडूशेठ ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहूब प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले आणि काही दिवसांनी ही मूर्ती रेल्वेने काश्मिरकडे रवाना करण्यात आली. कर्नल विनोद पाटील यांच्या या संकल्पनेची व मंदिराची मुहूर्तमेढ नोव्हेंबर 2019 मध्ये रोवली होती.

सुशोभिकरणासाठी चीड झाडाच्या लाकडाचा उपयोग

कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंदीर उभारणीसाठी बाटालियनच्या सर्व जवानांना मनापासून व उत्साहाने योगदान दिले. ज्यावेळी मंदिर उभारण्याचे काम सुरु झाले त्यावेळी त्या ठिकाणी 4 ते 5 फूट इतका बर्फ होता. पुढे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा बर्फ 12 फुटांपर्यंत वाढत गेला. मात्र, जवानांनी श्रीं चे काम प्राथमिक कर्तव्य समजून कामाला सुरुवात केली. जवानांनी आर्थिक योगदानही केले. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. मंदिरात दररोज पूजा व धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. हे मंदिर म्हणजे भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम आहे. दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतीचे दर्शन घेऊन जवानांच्या शौर्यात वृद्धी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अडीच फुटांची मूर्ती ट्रस्टकडून भेट

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मिरमधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाच्या आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुळे या मंदिराची शोभा वाढेल. यासाठी जवानांच्या इच्छेनुसार अडीच फुटांची गणेश मूर्ती या मंदिरासाठी ट्रस्टने भेट म्हणून दिली आहे. 2011 पासून 6 मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून त्यांना मूर्ती पाठवण्याचे ट्रस्टने ठरवले. मंदिरात धार्मीक विधी करून ही फायबर ग्लास मधील 36 इंचाची मूर्ती जूनमध्ये सैनिकांकडे सोपवण्यात आली होती. आता ती प्रत्यक्ष मंदिरात विराजमान झाली आहे.