रेल्वे लवकरच सुरू करणार नवीन विशेष गाड्या, तात्काळ कोट्यात तिकिटे बुक करण्याचीही मिळणार सुविधा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय रेल्वे लवकरच आणखी काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेऊ शकते. रेल्वे मंत्रालयाने या संबंधित प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठविला आहे. या गाड्या चालविण्याच्या योजना आखल्या जात आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक ट्रेनमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांची संख्या, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे स्कॅनिंगची तयारी यासारख्या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार केला जात आहे. दरम्यान, या अतिरिक्त विशेष गाड्यांचे थांबे किंवा भाड्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांच्या वतीने कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही.

प्रवाशांना 90 मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचणे आवश्यक
या नवीन विशेष गाड्यांच्या नियमित सॅनिटायझेशनवर रेल्वे विशेष भर देईल. प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या वेळेच्या 90 मिनिट आधी स्टेशनवर पोहोचावे लागेल, जेणेकरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नियमांद्वारे स्कॅन करता येईल. या विशेष गाड्यांसाठी तिकीट बुकिंग (एपीआर) 120 दिवस अगोदर सुरू होईल. त्याचबरोबर प्रवासी आवश्यक असल्यास तत्काळ कोट्यातूनही तिकिटे बुक करू शकतात.

काही मार्गांवर दररोज वाढतायेत प्रवासी
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी नुकतेच सांगितले की, उत्तर प्रदेशकडून धावणाऱ्या गाड्यांसह बिहार ते मुंबई, पश्चिम बंगाल ते मुंबई या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे देखील एक संकेत आहे की, देशातील आर्थिक क्रियाकलाप पुन्हा ट्रॅककडे परत येत आहेत. यादव म्हणाले की कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेकडून सर्व शक्य पावले उचलली जात आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन आणखी काही गाड्यांची यादी आठवड्यात दहा दिवसांत निश्चित केली जाऊ शकते.

कोणत्या मार्गावर धावणार नवीन गाड्या
माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे दिल्लीहून जाणाऱ्या अनेक विशेष गाड्यांची परवानगी मागितली आहे. यात नवी दिल्ली ते अमृतसर, चंदीगड ते जुनी दिल्ली ते फिरोजपूर, सराय रोहिल्ला ते पोरबंदर, दिल्ली ते भागलपूर, गाजीपूर अशा गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जोधपूर, कामाख्या आणि गोरखपूर ते दिल्ली, दिब्रूगड, इंदूर, हबीबगंज आणि लखनऊ ते नवी दिल्ली आणि मुझफ्फरपूर व मधुपुर येथून जुनी दिल्लीच्या विशेष गाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीतून जाणाऱ्या काही गाड्यांची यादीही गृहमंत्रालयाला सादर केली गेली आहे. यात कोटा ते देहरादून आणि नंतर नंदा देवी, दिब्रूगड ते अमृतसर, दिब्रूगड ते लालगड, मुझफ्फरपूर ते पोरबंदर आणि यशवंतपुर ते बीकानेर या विशेष गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान यावेळी भारतीय रेल्वे 230 विशेष गाड्या धावत आहे.