भारतातील ‘या’ हॉटेलमध्ये मिळते सर्वात महागडी ‘पाणीपुरी’, एका पीसची किंमत उडवेल झोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोलगप्पे म्हणजेच पाणीपुरी सर्वांनाच आवडते. भारतात हा खाद्यपदार्थ अनेक नावाने ओळखला जातो. पाणीपुरी भारतात सर्वात जास्त आवडीचे स्नॅक्स म्हणून ओळखली जाते. तोंडाला पाणी सुटणारी पाणीपुरी अवघ्या 20 रूपये किंवा 10 रूपयांना मिळत असल्याने, तिला मुख्य स्ट्रीट फूड म्हणून स्वीकारण्यास काहीच शंका नाही. परंतु, दिल्लीतील एका रेस्टॉरन्टमध्ये पाणीपुरीची किंमत हैराण करणारी आहे.

दिल्लीत एक असे रेस्टॉरन्ट आहे जेथे तुम्हाला एका पाणीपुरीची किंमत सुमारे 188 रूपये मोजावी लागेल. ही झाली अवघ्या एका पीसची किंमत. तर चार पाणीपुरी असलेल्या डीशसाठी येथे 750 रुपये मोजावे लागतील. ही पाणीपुरी दिल्लीतील हॉटेल पुलमॅनमध्ये उपलब्ध आहे.

हे असे हॉटेल आहे, जेथे पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली तर आधी खिसा तपासून पाहिला पाहिजे. ही पाणीपुरी खाण्याएवढे पैसे असतील तरच तुम्ही येथे जाऊ शकता. या पाणीपुरीचा स्वाद अन्य दुकानांच्या तुलनेत सामान्य आहे. केवळ हॉटेल लग्झरी असल्याने तेथे बसून खाण्याचे पैसे लावले जातात.