दिवसातून कितीवेळा श्वास घेता अन् सोडता तुम्ही ?, जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  असे सांगितले जाते की, माणसाचे आयुष्य हे श्वासात मोजले जाते. माणूस जन्माला आला की पहिला श्वास घेतो आणि मरताना पहिलाच श्वास सोडतो. तद्वतच, माणसांना जीवन जगण्यासाठी अन्न पाण्याएवढीच श्वास घेण्यासाठी शुद्ध हवेची गरज असते. श्वास घेताना ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडण्यात येतो. शहरातील वाढणाऱ्या प्रदूषणामुळे शुद्ध हवा मिळणे कठीण होऊन बसले आहे. मात्र, टाळेबंदी दरम्यान सर्वजण आपल्या घरात असल्याने त्याचा परिणाम वातावरणावर दिसून आला होता. तर आज आपण श्वसन प्रक्रियेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत.

अमेरिकन लंग्स एसोसिएशनने सांगितल्यानुसार, श्वास घेण्यासाठी फुफ्फुसांचा केवळ २५ टक्के वापर करण्यात येतो. दोन्ही फुफ्फुसांचे वजन ६५० ग्रॅम असते. २० ते २५ वयापर्यंत दोन्ही फुफ्फुसे परिपक्व होतात. ३५ वर्षानंतर फुफ्फुसांची कार्य करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. श्वसन करताना २१ टक्के ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. शरीरास ५ टक्के ऑक्सिजनची आवश्यकता असते. श्वास सोडताना बाकीची हवा बाहेर सोडण्यात येते. दर दहा वर्षांनी श्वास घेण्याची क्षमता एकूण ०.२ टक्क्यांनी कमी होते.

श्वास घेतल्यावर हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसापर्यंत जाते आणि रक्तात मिसळते. त्यामुळे शरीरातील भागांना ऑक्सिजन मिळते आणि ते निरोगी राहतात. शरीर श्वास घेते तेव्हा फुफ्फुस चार लिटरपर्यंत ऑक्सिजन आत घेऊन बाहेर सोडण्यासाठी सक्षम असतात. सामान्य माणूस एका मिनिटात १५ वेळा श्वास घेतो. एका दिवसाला तो २१६०० वेळा श्वास घेतो. माणसाच्या तुलनेत प्राण्याची श्वास घेण्याची क्षमता जास्त असून कुत्रा एका मिनिटात ६० वेळा श्वास घेतो. हत्ती आणि कासव एका मिनिटांत फक्त दोन ते तीनवेळा श्वास घेतात. श्वास घेण्याच्या योग्य पद्धतीने दीर्घायुष्य लाभते.

फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करताना तोंड झाकून घ्या. फटाके उडवू नका. अ‍ॅलर्जीच्या रुग्णांनी तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. अलीकडे ताप, सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर खबरदारीचा उपाय म्ह्णून भरपूर कोमट पाण्याचे सेवन करावे.