अमेरिका आणि इराण पुन्हा ‘आमने-सामने’, एकमेकांच्या युद्धनौकावर हल्ला करण्याचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणच्या जहाजांवर हल्ला करण्याचे आदेश आपण अमेरिकन नौदलाला दिले होते. त्यानंतर गुरुवारी इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डच्या कमांडरने इराणी जहाजांना अमेरिकन नौसेनच्या जहाजांवर हल्ला करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे. मात्र ट्रम्प यांच्या ट्विटनंतर आता दोन्ही देश पुन्हा एकदा एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले आहे. पर्शियाच्या आखातात हे दोन्ही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

इराणणे अमेरिका आणि इराणममध्ये मध्यस्थी करणार्‍या स्वित्झर्लंडच्या राजदूतांकडेही ट्रम्प यांच्या भूमिकेसंदर्भात आक्षेप नोंदवला आहे. इराणमधील रिवोल्यूशनरी गार्डचे कमांडर जनरल हुसैन सलामी यांनी, इराणची सेना कोणत्याही कारवाईचा निर्णायक, प्रभावी आणि तात्काळ उत्तर देण्यास सज्ज आहे, अशी माहिती दिली. अमेरिकेच्या लष्करी जहाजांनी इराणच्या लष्करी अथवा व्यापारी जहाजांवर हल्ला केला किंवा नुकसान केल्यास अमेरिकन लष्करी जहाजे आणि नौसेनेच्या तुकड्यांवर हल्ला करावा असे आदेश आम्ही इराणच्या नौसेनेला दिले आहेत, अशी माहिती सलामी यांनी दिली.

ट्रम्प यांनी 22 एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये, समुद्रामध्ये अमेरिकन नौदलाच्या जहाजांना इराणी जहाजांकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशा जहाजांवर हल्ला करण्याचे आदेश मी नौदलला दिले आहेत, असे नमूद केले होते. अमेरिकेने 3 जानेवारीच्या पहाटे बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना ठार मारले होते. अमेरिका – इराणमधील संबंध गेले वर्षभराहून अधिक काळापासून तणावपूर्ण आहेत. अमेरिकेने वर्षभराच्या कालावधीमध्ये इराणवर अनेक निर्बंध लादून त्याची कोंडी केली होती. या दोन देशांतील संबंध सुलेमानी यांच्या हत्येनंतर आणखीन ताणले गेले आहे.