इशरत जहां बनावट चकमक प्रकरण : डीजी वंजारा आणि एनके अमीन यांना मोठा दिलासा

अहमदाबाद : वृत्तसंस्था – इशरत जहां बनावट चकमक प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने निवृत्त पोलीस महासंचालक डी. जी. वंजारा, आणि एन के अमीन यांना दिलासा दिला आहे. दोघांनाही न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. याप्रकऱणी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.

इशरत जहां बनावट चकमक प्रकरणात माजी पोलीस महासंचालक वंजारा आणि एन के अमीन यांनी आपली नावे न्यायालयाच्या कामकाजातून वगळली जावीत असा अर्ज सीबीआय कोर्टात केला होता. त्यानतंर सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. के. पांडे यांनी तो अर्ज मंजूर केला.

या प्रकरणी सीबीआयने माजी पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, माजी महासंचालक डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल, एन. के. अमीन, तरुण बरोट यांच्यासह अन्य २ पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते.