कडक सॅल्यूट ! जखमी महिलेच्या उपचारासाठी ITBP जवानांनी 15 तास चालत केला 40 KM चा प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. विशेषत: एखाद्याची तब्येत ढासळल्यास रुग्णालयात उपचारासाठी जाण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुर्गम खेड्यांमध्ये ही परिस्थिती बिकट आहे. दरम्यान, वृत्तसंस्था एएनआयने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये दिसून येते की, आयटीबीपी जवान एक जखमी महिलेला अवघड रस्ता ओलांडून उपचारासाठी घेऊन जात आहे.

व्हिडिओ उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील दुर्गम खेड्यातील लापसाचा आहे. येथे एक महिला जखमी झाली, तिच्या उपचारासाठी आयटीबीपी जवानांनी मुनस्यारीपर्यंतचा प्रवास पायी चालत केला. वाटेत पर्वत, नद्या व नाल्यांशिवाय दरडी कोसळलेले क्षेत्रही लागले. आयटीबीपी जवानांच्या पथकाने त्या महिलेला स्ट्रेचरवर घेतले आणि 15 तासात चालत 40 किमी अंतर पूर्ण केले. अडचणींवर मात करून या जवानांनी महिलेला रुग्णालयात आणले.

उत्तराखंडमध्ये पावसामुळे रस्ते उघडण्यात अडचणी येत आहेत. राज्यभरातील 210 रस्ते अद्याप बंद आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हरिओम शर्मा म्हणाले की, राज्यात एलएनआयव्हीचे 104 तर पीएमजीएसवायचे 106 रस्ते बंद आहेत आणि ते उघडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यात चार राष्ट्रीय महामार्ग, सात राज्य रस्ते आणि आठ जिल्हा रस्ते बंद असल्याची माहिती त्यांनी दिली. रस्ते उघडण्यासाठी 305 जेसीबी आणि पोकलँड मशीन बसविण्यात आल्या आहेत.