MP नंतर BJP च्या निशाण्यावर राजस्‍थान ! काँग्रेसचे 36 आमदार संपर्कात, सूत्रांचा दावा

जयपुर: वृत्तसंस्था – मध्यप्रदेश नंतर आता इतर मोठ्या काँग्रेसशासित राज्यांवर भाजपचा डोळा असल्याचे बोलले जात आहे. मध्यप्रदेश नंतर आता राजस्थानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात विधानसभा निवडणूका जिंकल्यानंतर काही महत्वपूर्ण गोष्टींवरून मतभेद असल्याचे समजते आहे. आता राजस्थानातील भाजपच्या काही सूत्रांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, काँग्रेसचे ३ डझन नाराज आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. भाजपच्या सूत्रांच्या या दाव्यांवर विश्वस ठेवला तर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार प्रमाणेच राजस्थानात देखील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार असुरक्षित आहे.

सचिन पायलट यांची गेहलोत यांच्यावर नाराजी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सचिन पायलट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज आहेत. असे सांगितले जात आहे की, काँग्रेसच्या भूमिकेवरून पायलट यांनी गेहलोत यांची तक्रार देखील केली आहे. पायलट यांच्याशिवाय त्यांच्या पक्षातील काही आमदार देखील गेहलोत यांच्यावर नाराज आहेत. नुकतेच विधानसभेत देखील पायलट यांच्या गटातील आमदारांनी गेहलोत सरकार वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विधानसभा निवडणुकांनंतर अशोक गेहलोत यांच्याकडे राजस्थानची सूत्रे आल्यानंतर पायलट आणि त्यांच्या तणाव आहेत. भाजपच्या सूत्रांनी राजस्थान काँग्रेसचे ३ डझन नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

असे आहे विधानसभेचे सध्याचे गणित

राजस्थानात विधानसभेच्या एकूण २०० जागा आहेत. त्यामध्ये सरकार बनवण्यासाठी १०१ आमदारांची गरज असते. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या होत्या. मित्रपक्ष आणि अपक्षांच्या मदतीने कॉंग्रेसने सहजतेने बहुमताचा आकडा पार केला.दुसरीकडे २०१३ मध्ये राजस्थानमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपाला केवळ 73 जागा मिळू शकल्या. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. या दोन पक्षांशिवाय बसपाच्या खात्यात 6 जागा आणि राष्ट्रीय पक्षात एक जागा होती.