पोलिस स्‍टेशनवर ग्रेनेड हल्‍ला, तिघे जखमी 

जम्‍मू-काश्मीर : वृत्तसंस्था – दहशतवाद्यांनी एका स्‍थानिक पोलिस स्‍टेशनवर ग्रेनेड हल्‍ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तीन नागरिक जखमी झाल्याचे समजत आहे. जम्‍मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामधील पोलिस स्टेशनमधील ही घटना आहे. तसं पाहिलं तर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणे ही काही नवीन बाब नाही. येथे वारंवार असे हल्ले होत राहतात. भारतीय जवान अनेकदा अशा दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत त्यांना कंठस्नान घालतात.

जम्‍मू- काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील धामल हांजीपोरातील स्‍थानिक पोलिस स्‍टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्‍ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये तीन सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. सदर ग्रेनेडचा रस्‍त्‍याच्या कडेला स्‍फोट झाल्‍यामुळे याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. यात 3 नागरिक जखमी झाले आहेत. अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

ग्रेनेड हल्लाच्या या घटनेनंतर जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिवाय या हल्ल्यातील जखमी नागरिकांना तात्कळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे,  सुरक्षा जवानांनी या परिसराची नाकाबंदी केली असून, हल्‍लेखोरांचा तपास सुरू केला असल्याचे समजत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.