धक्कादायक ! जवानानं पत्नीचा गळा दाबून केला खून, स्वतः संपवण्याचा प्रयत्न

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – घरात झालेल्या वादातून सैन्यातील जवानाने आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने आपल्या स्वत:च्या हातावर चाकूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीचे वडील हे त्याचवेळी घरी पोहचल्याने त्याचे प्राण वाचू शकले. चैत्राली सुनिल बावा (वय २३) असे खुन झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर, सुनिल बावा (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरीमध्ये बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

सुनिल आणि चैताली यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना अडीच महिन्यांची मुलगी आहे. सुनिल भारतीय लष्करात नोकरीला असून सध्याच्या त्याची नेमणूक श्रीनगरला आहे. दहा दिवसांपूर्वी तो सुट्टी घेऊन नाशिकला घरी आला होता. बुधवारी रात्री त्याचा पत्नीबरोबर वाद झाला होता. त्यानंतर त्याने कशाने तरी चैत्रालीचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर त्याने कल्याण येथे राहणारा चुलतभाऊ किशोर भारती याला फोन केला.

त्यावेळी बोलत असताना किशोर याने वहिनी कोठे आहे, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने ती स्वर्गात गेली असे सांगितले. किशोर यांना संशय आल्याने त्यांनी सिडकोत राहणाऱ्या  चैताली यांचे वडिल प्रकाश बावा यांना ही माहिती दिली. काही वेळातच ते पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरी येथे पोहचले. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. तरीही त्याने दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आवाज दिल्यावर सुनिल याने दरवाजा उघडला. चैताली घरात जमिनीवर पडलेली दिसत होती. सुनिल याने हातावर चाकूने मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी सुनिल याला ताब्यात घेतले.

You might also like