जेजुरी : गोरगरिबांसाठी वरदान ठरतेय वाल्मिकींचे अन्नछत्र

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना काळात उपासमार थांबावी याउद्देशाने लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या वाल्हे येथील महर्षी वाल्मिकींचे अन्नछत्र हे अनेक गोरगरिबांसाठी वरदान ठरू लागले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने वाल्हे सह परिसरात गरजू कुटुंबांना किराणा कीट चे वाटप करण्यात आले होते .परंतु ठिकठिकाणी या सामाजिक उपक्रमांना देखील राजकीय रंग चढू लागल्याने प्रामाणिक लाभार्थीच अशा मदतीपासून वंचित असल्याचे चित्र होते.त्यामुळे अनेक गोरगरिब कुटुंबांवर मात्र नाईलाजास्तव उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत त्यांची हिच अडचण लक्षात घेऊन भारतीय पत्रकार संघासह महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघ तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत लोकसहभागातून वाल्हे येथील वाल्मिकींच्या समाधीस्थळी अन्नछत्राची उभारणी केली आहे .

या अन्नछत्राच्या माध्यमातून गेल्या ८ दिवसांपासून प्रतिदिन दीडशे ते दोनशे गोरगरिब ग्रामस्थांसह ऊसतोड कामगार, मजूर तसेच भटकंती करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची भूक भागवली जात असून सोशल डीस्टन्स देखील पाळला जात आहे .या स्तुत्य उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन दुर्गाडे ,अमोल भुजबळ, नाना दाते, विशाल भुजबळ, शरद कदम, नितीन भुजबळ, अस्लम नदाफ, वारकरी संप्रदायाचे अशोक महाराज पवार पत्रकार संघाचे अध्यक्ष सिकंदर नदाफ उपाध्यक्ष रमेश लेंडे ,कार्यकरणी सदस्य संदीप झगडे, जयंत पाटील,राजेंद्र जावळेकर यांसह बहुसंख्य पत्रकार मित्रांनी देखील सहभाग नोंदवला आहे.