‘पत्रकार’च निघाला चीनचा गुप्तहेर ! दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं फ्रीलांसिंग करणाऱ्या एका पत्रकाराला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकाराकडून देशाच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. राजीव शर्मा असं या पत्रकाराचं नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं त्यांना अटक केली आहे.

हे सर्व दस्तऐवज राजीव शर्माकडे कसे पोहोचले आणि तो त्यांचा काय वपार करत होता याचा तपास दिल्ली पोलिसांचं विशेष पथक करत आहे. या प्रकरणी राजीव शर्माला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शर्मा एक युट्युब चॅनलही चालवतात. त्यांनी पत्रकारीतेच्या संस्थांसोबत कामही केलं आहे. त्यांनी ग्लोबल टाईम्ससाठी एक लेखही लिहला होता.

राजीव शर्मानं लिहिलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये नेमकं काय म्हटलं आहे ?

7 सप्टेंबर रोजी ग्लोबल टाईम्ससाठी शर्मानं एक लेख लिहला होता. या लेखात 5 मेच्या रात्री भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावानंतर गेल्या अनेक वर्षातील दोन्ही देशांच्या व्यवहारीक संबंधांवर मोठा परिणाम झाला. दोन्ही देशात होणारे आर्थिक व्यवहार आणि आयात-निर्यातीवरही मोठ्या प्रमाणात बंदी आली. 1962 च्या युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव ही धोक्याची घंटा आहे. आपल्या लोकांसाठी शांततापूर्ण उज्वल भविष्य निर्माण करणं हा त्यांचा उद्देश आहे. एकमेकांविरोधात सैन्य उभं करणं हा उद्देश नाही.

विशेष पथकाचे पोलीस उपायुक्त संजीव कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या संरक्षणाबाबत गोपनीय माहिती असणारी कागदपत्रं राजीव शर्माकडे सापडली आहेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल. 14 सप्टेंबर रोजी राजीव शर्माला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं शर्माला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीनं ही कागदपत्र कुठून मिळवली या संदर्भात चौकशीदरम्यान काही दुवे मिळाले आहेत. पोलीस त्या ठिकाणी जाऊन तपास करणार आहेत. या प्रकरणात राजीव शर्माच्या कुटुंबीयांची देखील चौकशी केली जाणार आहे.