कदमवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी साधला शिक्षण मंत्र्यांशी संवाद

जेजुरी (संदीप झगडे) : मॅडम तुम्ही आमच्या शाळेला भेट द्यायला याल का? मॅडम आम्हालाही वाटते आमचे शिक्षण मोठ्या शाळांमधून व्हावे… मॅडम आम्हाला आमचे सर व मॅडम शिकवतात…. हे संवाद आहेत थेट महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व कदमवस्ती शाळेतील विद्यार्थी यांच्यातील…

कदम वस्ती तालुका पुरंदर येथील उपक्रमशील व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान डिजिटल शाळेतील आठ विद्यार्थी व पालकांना येथील उपक्रमांची व गुणवत्तेबाबतची माहिती मुंबई येथे आपल्या निवासस्थानी बोलावून जाणून घेतली. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यादेखील विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आवर्जून उपस्थित होत्या.

मुख्याध्यापक अनंता जाधव यांनी शाळा व शाळेतील विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती, सुंदर हस्ताक्षर, इंग्रजी वाचन लेखन, गणितीय क्रिया इ.प्रगती पाहून मंत्री महोदय व शिक्षण सचिव भारावून गेल्या.

विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर, इंग्रजी विषयावरील प्रभुत्व, संख्यावाचन, गणिती क्रिया, वाचन-लेखन संभाषणाविषयी संवाद साधला. विद्यार्थ्यांची अफाट गुणवत्ता व हजरजबाबीपणा पाहून शिक्षण मंत्री व सचिव व भारावून गेल्या.

त्यांनी मुलांना आपल्या जवळ घेऊन आपुलकीने मुलांशी संवाद साधला. यावेळी श्रावणी हिंगणे आई या विषयावरील भाषणाने तेथील वातावरण अत्यंत हृदय स्पर्शी व भावुक झाले. शिक्षणमंत्र्यांनी श्रावणीला जवळ घेऊन आपुलकीने शाबासकी दिली. भेटलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेतील उपक्रमाची माहिती शिक्षणमंत्र्यांनी आमच्या शाळेला एकदा भेट द्यावी हे लेखी स्वहस्ताक्षरांतील पत्रातून विनंती केल्याचे सुंदर हस्ताक्षरातील पत्रे पाहून उपस्थित सर्वचजण अवाक झाले.विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना खाऊ देखील यावेळी दिला.आमची शाळा पाहायला नक्की या. असे लेखी सुंदरहस्ताक्षरातील विनंती पाहून नक्की येईल …असे मंत्रीमहोदयांनी सांगितले.

यावेळी आमदार संजय जगताप, सुनिल चंदनशिवे, पालक बाळासाहेब काळे, संदीप कदम, मुख्याध्यापक अनंता जाधव केंद्रप्रमुख अनिल जगदाळे उपशिक्षिका सुरेखा जाधव,तंत्रस्नेही शिक्षक नंदकुमार चव्हाण,अनिल कड उपस्थित होते.