Coronavirus : मला रुग्णसेवेची परवानगी द्या, डोंबिवलीच्याच्या महापौरांकडून आयुक्तांना विनंती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. या संकटाला भिडण्यासाठी अनेकजण मदत करीत आहेत. विविध क्षेेत्रात काम करीत असतानाही अनेकांकडून पुर्वीच्या पेशाने काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, परिचारिकांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवलीच्याच्या महापौरही पूर्वी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत त्यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे.

देशासह राज्यातील विविध भागात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक संकटात सापडले आहेत. मी महापौर असले तरी माझ्यातील परिचारिका स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे रुग्णसेवा करण्यासाठी मला परवानगी देण्यात यावी, अशी विनंती कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच खबरदारी घेऊन कठोर उपाययोजना केल्या आहेत.

कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सर्वांनीच योगदान देण्याची गरज आहे. मी कल्याण डोंबिवली महापालिकेची महापौर असले, तरी नायर रुग्णालयात 32 वर्षे परिचारिका म्हणून सेवा केली आहे. त्यामुळे देश संकटात असताना मी स्वस्थ बसू शकत नाही. मी कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात सेवा देण्यास तयार असून, मला अनुमती मिळावी, असे महापौर विनीता राणे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.