काँग्रेस पक्षाची मोठी घसरण होत असल्याचे स्वीकारले पाहिजे, कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली भीती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   “आपल्या पक्षाची मोठी घसरण होत असल्याचे काँग्रेसने सर्वांत आधी स्वीकारायला हवे. आपले कुठे चुकत आहे, हे काँग्रेसला नक्कीच ठाऊक आहे. पण त्याबद्दल कोणीदेखील बोलण्यास तयार नाही. हे असेच चालू राहिले, तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी घसरत राहील,” अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.

एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, बिहारच नाही तर देशात अन्य ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांत जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षाच उरलेल्या नाहीत. गुजरातमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये हेच झाले होते, तर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्केच मते पडली. जनमताचा संदेश स्पष्ट आहे की, त्यांनी आपल्याला नाकारले आहे.

त्याचप्रमाणे, “बिहारमध्ये झालेल्या पराभवाचे काँग्रेस पक्ष नेतृत्वास गांभीर्य नाही. या पराभवानंतर नेतृत्वाकडून कसल्याही प्रकारची चर्चा घडल्याचे माझ्या कानावर आले नाही. कदाचित सर्व काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असे पक्ष नेतृत्वास वाटत असावे,” अशी टीकाही सिब्बल यांनी केली.