काश्मीरविषयी शाहिद आफ्रिदीचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला..

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीचे आत्मचरित्र ‘गेम चेंजर’ नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये अनेक महत्वाच्या विषयावर मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामध्ये काश्मीरच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचे, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे, असे आफ्रिदीने त्याच्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात लिहीले आहे.

काश्मीरविषयी आत्मचरित्रात मत मांडताना आफ्रिदी म्हणाला आहे की, ‘काश्मीर हे ना भारताचे आहे ना पाकिस्तानचे. काश्मीर हे फक्त काश्मीरी जनतेचे आहे. इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत. पंतप्रधानाबद्दल वक्तव्य करने सोपे आहे. मात्र, त्यांच्यासारखे काम करणे कठीण आहे.’

काश्मीरला स्वतंत्र राहु द्या
दरम्यान काश्मीर मुद्यावर वक्तव्य करण्याची आफ्रिदीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने काश्मीरविषयी वक्तव्य केली आहेत. काश्मीरविषयी मत मांडताना आफ्रीदी म्हणाला होता की, ‘पाकिस्तानलाही काश्मीर नको आहे. त्यांच्याकडून तर तेथील जनताच सांभाळली जात नाही. काश्मीर भारतालाही देऊ नका. मी म्हणतो काश्मीरला स्वतंत्र राहु द्या. काश्मीर हा काही मुद्दा नाही. माणुसकी मोठी गोष्ट आहे. ज्या लोकांचा तेथे मृत्यू होतोय. ते कोणत्याही धर्माचे असोत. माणूस म्हणून दुःख होतं. किमान माणुसकी तरी जिवंत राहु द्या.’

‘गेम चेंजर’ला आफ्रिदीने पत्रकार वजाहत एस खान यांच्या मदतीने लिहले असून, ‘हार्परकॉलिन्स इंडिया इम्प्रिंट हॉर्पर स्पोर्ट्स’ने प्रकाशित केले आहे. आत्मचरित्रामध्ये क्रिकेटच्या रंजक कथा, विंग कमांडर अभिनंदन, काश्मीर, भारत-पाक आणि इम्रान खान सरकारवर यांसह विविध विषयावर लिहिले आहे.