‘त्यानं’ वयाच्या 17 व्या वर्षी वाचवला होता अनेकांचा जीव, आता मृत्यूनंतरही दिले 8 जणांना जीवनदान

पोलीसनामा ऑनलाईन टीम : केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये अनुजीत या तरुणाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. अनुजीतचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने आठ रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे. 27 वर्षीय अनुजीत एका अपघातामध्ये जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र गंभीर दुखापत, डोक्याला लागलेला मार आणि पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नसल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर अवयवदानाच्या माध्यमातून अनुजीतने मृत्यूनंतरही आठ जणांचे प्राण वाचवले.

विशेष म्हणजे 2010 साली वयाच्या 17 व्या वर्षी अनुजितने प्रसंगावधान दाखवल्याने एक रेल्वे अपघात टळला होता. यावेळेही त्याने शेकडो लोकांचे प्राण वाचवले होते. ड्रायव्हर म्हणून काम करणार्‍या अनुजीतची नोकरी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये गेली होती. त्यानंतर तो एका सुपरमार्केटमध्ये काम करु लागला. 14 जुलै रोजी कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाराकारा येथे अनुजीतचा अपघात झाला. रात्री साडेअकरा वाजता कामावरुन घरी जात असतानाच अनुजीतच्या बाईकसमोर एक व्यक्ती आली.

या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात अनुजीत बाईकवरुन खाली पडला आणि त्यातच त्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर अनुजीतला कोट्टाराकारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्याला तिरुवनंतपुरममधील रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यानंतर तेथूनही त्याला किम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने अवयव दान केल्यामुळे आठ जणांचा जीव वाचला आहे.