काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांचं भाकित, म्हणाले – ‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सध्या राजकीय क्षेत्रात केंद्र विरोधात राज्य सरकार असा कलगीतुरा रंगलेला आहे. गेल्याच महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविली होती. शुक्रवारी रात्री खडसेंना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मध्यन्तरी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. आता मात्र त्यांचा पाठलाग ईडी करताना दिसत आहे. एकनाथ खडसे याना ईडीने ३० डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस पाठविल्याचे सांगितले जात आहे. अद्याप ही नोटीस खडसेंना मिळाली नसली तरीही महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये तसंच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अद्याप नोटीस मिळाली नाही, नोटीस मिळाल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा देताना “भाजपाने ईडी काढली आता आम्ही सीडी काढू,” असा इशारा दिला होता. आता काँग्रेसचे आमदार आणि ठाकरे सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. आज खडसे, तर उद्या माझाही नंबर लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपाला हा धंदा खूप महागात जाईल असा इशाराही वड्डेटीवार यांनी दिला आहे. सरनाईक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात होते. यावरून शिवसेनेने भाजपाला आव्हानही दिले होते. मात्र, दुसरा नंबर राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंचा लागला आहे. आता ही नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुण्यातील भूखंड घोटाळा की आणखी कशाबाबत ते लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, यावरून आता ईडी आणि सीडीचे राजकारण राजकीय वर्तुळात चांगलाच रंगणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्यामुळेच केंद्रावकडून हे दबावतंत्र वापरले जात आहे. ज्यादिवशी एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देतील, असं सांगितलं होतं. पण ते जेव्हा ईडी पाठवतील तेव्हा मी सीडी दाखवेन असे खडसे म्हणाले होते. आता भाजपाने ईडी दाखविली आहे. यामुळे सीडीही निघणार आहे. विधानसभेच्या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठविल्याची ओरड उठली होती. आता खडसेंना पाठविली आहे. हुकुमशाहीच्या राजकाराणाला काही अर्थ नाही असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.