अजितदादा आणि जितेंद्र आव्हाडांच्या नाराजीच्या वृत्तावर खडसेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. त्यानंतर १२ ते १५ माजी आमदार माझ्या संपर्कात असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा, दावा एकनाथ खडसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. खडसे यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपात खळबळ उडाली आहे.

तथापि, या दाव्यानंतर कोणते माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तद्वतच, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नाराज असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केले होते. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या पाहून माझी आणि शरद पवार यांची खूप करमणूक झाली.

मला पक्ष सोडू नका म्हणून फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता. बाकीच्या कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटना मंत्र्यांचा सुद्धा मला फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान भाजप सोडण्या संदर्भात फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये फक्त युझ अँड थ्रोची पद्धत, असल्याची टीका खडसे यांनी केली.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, यासंदर्भात महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. कारण, शिवसेना कृषी मंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याचं कळत आहे. तर जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्याकडे असलेले गृहनिर्माण खाते खडसेंना देण्यास तयार नसल्याची माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने बराच वेळ जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाय. बी. चव्हाण सेंटर मध्ये महत्वाची चर्चा झाली.