आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार होणार सुरु होणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. आयसीसीने 2020 ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली आहे. मात्र क्रीडा स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना आता हळूहळू यश मिळत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केले असून त्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.
वेस्ट इंडिजचा नियोजित इंग्लंड दौरा हा जून महिन्यात होता. पण कोरोनाच्या तडाख्यामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार आता 8 जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

आयसीसीच्या नव्या नियमांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने मालिका सुरू होण्याच्या महिनाभर आधीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होत असल्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संघ इंग्लंडसाठी प्रयाण करत असल्याचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने या मालिकेसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.

संघातील डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या 3 खेळाडूंनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे कारण देत इंग्लंड दौर्‍यावर जाण्यास नकार दिला होता. त्यावर, सध्याच्या खडतर काळात मंडळ कोणत्याही खेळाडूवर दौर्‍यावर जाण्याची बळजबरी करणार नाही, असेही विंडीज क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.