पुण्यातील अपहरण केलेल्या मुलाची ४ तासात सुटका

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत यासाठी अपहरण केलेल्या १५ वर्षाच्या मुलाची सुटका अवघ्या चार तासात हिंजवडी पोलिसानी केली आहे. तसेच अपहरणकर्त्याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी नऊच्या सुमारास नेरे दत्तवाडी येथे घडली.

याप्रकरणी ३६ वर्षीय इसमाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अरुण शिवाजी जाधव (२८, रा. निर निमगाव, ता. इंदापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण आणि फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पैशांचा व्यवहार होता. मंगळवारी सकाळी अरुण फिर्यादी यांना कर्जाची रक्कम पाच लाख रुपये मागितले. त्यावर फिर्यादी यांनी कर्जाची सर्व रक्कम दिली असून दहा ते अकरा हजार बाकी आहेत, असे सांगितले. उर्वरित रक्कम थोड्या दिवसात देतो असे म्हणून फिर्यादी कामावर गेले. पैसे न देता निघून गेल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या पंधरा वर्षीय मुलाला फूस लावून पळवून नेले. याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारे, अजय जोगदंड, तपासी पथकाचे उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे आणि त्यांचा पथकाने शोधाशोध करुन अवघ्या चार तासात मुलाची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला अटक केली. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.