धक्कादायक… चिंचवडमधील गुरुकुलम आश्रमातून मुलींचे अपहरण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या गुरुकुलम या आश्रमातून दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १५ डिसेंबरला सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडला असून सतिश रामभाऊ अवचर यांनी काल (रविवारी) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोणीतरी अज्ञात इसमाने १२ आणि ८ वर्ष वयाच्या मुलींना फूस लावुन पळवुन नेले असावे, अशी फिर्याद सतिश रामभाऊ अवचर यांनी चिंचवड पोलिसांकडे दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव येथील गावडे तलावाजवळ गुरूकुलम नावाचा आश्रम आहे. माता, पित्याकडून योग्य प्रकारे सांभाळ होत नसलेली मुले,अनाथ मुले या आश्रमात आहेत. एका आठ वर्षाच्या आणि एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. कोणीतरी त्यांना फूस लावुन पळवुन नेले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत इंद्रायणीनगर येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना, गुरुकुलम आश्रमातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने आश्रमातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.