धक्कादायक ! कोल्हापूरमधील CPR मधील ट्रॉमा केअर सेंटरला आग, दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनासोबत लढा देणाऱ्या सीपीआर रुग्णालयाच्या प्रशासनाला सोमवारी भल्या पहाटे अचानक लागलेल्या आगीचा सामना करावा लागला. कोरोना रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे 4 वाजता लागलेल्या आगीमुळं रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला. अतिशय गंभीर अवस्थेत उपचार घेत असलेल्या 15 रुग्णांना अन्य ठिकाणी हलवण्यात आलं. त्यांना व्हेंटीलेटवर जोडेपर्यंत 2 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सीपीआर रुग्णालयात सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास वेदगंगा बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोठी आग लागली. या घटनेनं डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्माचाऱ्यांना थरकाप उडाला. या सेंटरमध्ये अनेक गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. प्रत्येकाला व्हेंटीलेटर लावण्यात आलं होतं. अचानक व्हेटीलेटरमधून धूर यायला सुरुवात झाली. काही वेळातच त्यानं पेट घेतला. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय आणि सुरक्षा रक्षकांनी तेथील 15 रुग्णांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली. याशिवाय लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांचे जवान पोहोचे पर्यंत 7-8 रुग्णांना तेथून बाहेर काढण्यात आलं. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पीपीई किट घालून इतर 7 जणांना बाहेर काढलं.

पोलीस आणि जवानांनी फायर अक्सीग्युशनच्या सहायानं व्हेंटीलेटरला लागलेली आग विझवण्यात यश मिळवलं. या सगळ्या धावपळीत हात भाजल्यानं एक सुरक्षा रक्षक जमखी झाला तर एक कर्मचारी धुरानं गुदमरल्यानं बेशुद्ध पडला. या दोघांचीही प्रकृती आता ठिक आहे.

अग्निशमन दल, वरिष्ठ परिचारिका, चुतर्थ श्रेणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांनी तात्काळ आग विझवली. या घटनेची माहीती मिळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत मस्के, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, मनिष रणभिसे यांच्यासह रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख यांनी तातडीनं धाव घेत घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

‘मृत्यू आगीमुळं नाही’- सीपीआर
या दुर्घटनेत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पंरतु त्यांचे मृत्यू हे आगीमुळं किंवा तिथे निर्माण झालेल्या धुरामुळं नाही तर दुसरीकडे स्थलांतरीत करून तात्काळ व्हेंटीलेटर जोडेपर्यंत झालेल्या विलंबामुळं झाला आहे असा खुलासा सीपीआर प्रशासनानं केला आहे. सीपीआरमध्ये पर्यायी व्हेंटीलेटरची सोय करेपर्यंत काही रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आलं. इतर रुग्णांची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जातं आहे.

सीपीआर रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकांत मस्के म्हणाले, सीपीआरमधील आयसीयुमधील एका कक्षात इलेक्ट्रीक बोर्डात शॉर्ट सर्कीच झाला आणि आज पहाटे आग लागली. या कक्षातील 15 लोकांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आलं. त्यामुळं कोणत्याही प्रकारची जिविताहानी किंवा दुखापत झाली नाही.