‘कोथरूड’आता कुणाच्या ‘वाट्या’ला !

युतीत होणार 'कलगीतुरा' ?

पुणे : पोलीसनामा [ विश्लेषण ] – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य देत भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची परंपरा यावेळीही कोथरूड विधानसभा मतदारसंघाने जपली आहे. मात्र शिवाजीनगर मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही कोथरूड विधानसभा मतदार संघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला होता ; पण गत विधानसभा निवडणुकीत युतीत काडीमोड झाला आणि तब्बल २५ वर्षांनी या मतदारसंघात ‘कमळ’ फुलले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ कुणाला जाणार यापेक्षा युतीत त्यावरून वादाची ठिणगी पडते का ? हा प्रश्न आता चर्चेला आला आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी येथून शिवसेना नेते शशिकांत सुतार त्यानंतर विनायक निम्हण यांनी नेतृत्व केले होते. त्यानंतर शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे येथून आमदार झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीत काडीमोड झाला आणि पंचवीस वर्षानंतर भाजपने या मतदारसंघात मुसंडी मारली. प्रा. मेधा कुलकर्णी या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याने या मतदारसंघावर भाजपचा दावा भक्कम झाला. त्यात पालिका निवडणुकीतही कोथरुडकरांनी भाजपाला पसंती दिली आणि भरभरून मते देत हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्यावर शिक्कामोर्तब केले.

विद्यमान आमदार आणि सुमारे १८ नगरसेवक यामुळे या मतदारसंघावर भाजपचा दावा भक्कम झाला आहे. शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा ठोकला जाणार असला तरी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या कामांमुळे येथील जनाधार हा भाजपच्या मागे आहे. त्यात स्थायी समिती अध्यक्षपदाच्या माध्यमातून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनीही प्रभावी कामकाज केले आहे. लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांच्या नावाचाही प्रारंभी उमेदवार म्हणून उल्लेख झाला होता. तेही या मतदारसंघातून आमदारकीसाठी नशीब आजमविण्यास उत्सुक आहेत. असे असले तरी वरकरणी एकसंध असलेल्या या मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचे प्रमाण मोठे आहे. भाजपच्या कामगिरीमुळे आणि आरएसएसच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने सध्यातरी भाजपचा वारू येथून कुणीही रोखू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे हेही यंदा या मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि हा मतदारसंघ पूर्वी सेनेचा बालेकिल्ला होता यासाठी ते नेहमीच आग्रही राहणार आहेत.

गिरीश बापट यांच्या प्रचारात भाजपच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेने या मतदारसंघात काम केले आहे. शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार यासह शाम देशपांडे हेही या मतदारसंघात प्रभावी कामकाज करीत आहेत. शाम देशपांडे यांचा सर्व वर्गाशी उत्तम संपर्क आहे मात्र सेनेलाही गटबाजीचे ग्रहण आहे. असे असले तरी या मतदारसंघावर कब्जा मिळविण्यासाठी शिवसेनेने आतापासून तयारी चालवली असली तरी युतीच्या ‘ बोलणी’त हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.जागावाटपात ‘शिवाजीनगर’च्या बदल्यात ‘कोथरूड’ आम्हाला द्या अशी मागणी शिवसेनेकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे मात्र त्यामागे ‘ प्रगती पुस्तका’त अव्वल ठरलेल्या प्रा. मेधा कुलकर्णी यांना रोखण्याची खेळी भाजपमधील इच्छुकांची असल्याचे बोलले जात आहे ;पण गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात आमदार मेधा कुलकर्णी या शेवटपर्यंत अग्रभागी राहिल्याने शिवसेनेसह भाजपमधील इच्छुकांचे मनसुबे ‘पाण्या’त जाण्याची चिन्हे आहेत. यापार्श्वभूमीवर हा मतदारसंघ कुणाच्या पारड्यात जातो हाच मुद्दा राजकीय वर्तुळात आता महत्वाचा ठरला आहे.